विकेंडच्या दोन दिवसात बदला तुमच्या राहत्या घराचे रंगरूप

interior

सुट्टीच्या दिवसाचा सदुपयोग करून झटपट आपल्या घराचा कायापालट करा. कसा ते जाणून घ्या ह्या लेखात.

तुम्ही त्याच घरात अनेक वर्षे राहून कंटाळला आहात का? घर वारंवार रिनोवेट करणे तुम्हाला वेळखाऊ आणि खर्चीक वाटते का?

आणि तरीही आपल्या घराचे रंगरूप पालटून जावे अशी तुमची इच्छा आहे का?

तसे असेल तर आम्ही तुमच्यासाठी अशा ५ सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे ह्या विकेंडला केवळ २ दिवसात तुम्ही तुमच्या घराचे रंगरूप पालटू शकाल. नव्या घरी राहायला गेल्याचा आनंद मिळवू शकाल.

काय आहेत त्या ५ टिप्स?

हे अगदी खरे आहे की घराच्या त्याच त्याच जुन्या सजावटीचा आपल्याला कंटाळा येतो, घरात काहीच नावीन्यपूर्ण दिसत नाही, अगदी बोरिंग वाटायला लागतं.

पण वेळ आणि पैसा ह्या दोन्ही अभावी आपण घराची सजावट काही वारंवार बदलू शकत नाही.

अशा वेळी आपल्या आहे त्याच घरात अगदी थोडक्या वेळात आणि थोड्याशा खर्चात काही बदल केले तरीही घराचे रुपडे बदलून जाते.

घर अगदी नवे होऊन जाते. आपल्यालाही नव्या घरी राहायला गेल्यासारखा उत्साह येतो.

कसे करता येईल असे?

जाणून घ्या  सजावटीच्या ५ उपयोगी टिप्स 

१. घराची जुनी भिंत, चढवी नवा रंग 

शुक्रवारी संध्याकाळी घरी आल्यावर घरातल्या कुठल्या खोलीतल्या कुठल्या भिंतीला नव्या रंगाची गरज आहे ते बघून ठेवा.

शनिवारी सकाळी लवकर उठून, मस्तपैकी आवरून बाजारात जा. आपल्या आवडीच्या रंगाचा डबा खरेदी करा, आणि हो, रंग लावण्यासाठी रोलर/ ब्रश खरेदी करायला विसरू नका.

घरी येऊन सर्वानी मिळून भिंत रंगवण्याचा कार्यक्रम हातात घ्या. सर्वानी मिळून काम करण्याची मजा अनुभवा. भिंत रंगवताना तुम्ही वेगवेगळी चित्रे, शेडिंग अशी कलाकुसर सुद्धा करू शकता.

दुसऱ्या दिवशी झालेला पसारा आवरून टाका. आणि केवळ २ दिवसात बदललेले आपल्या खोलीचे नवे प्रसन्न रूप अनुभवा. आहे की नाही सोपी युक्ति?

२. रंगीबेरंगी फुलझाडे, बदलतील घराचे रुपडे 

घराच्या सजावटीत जर तोचतोचपणा आला असेल तर फुलझाडे हा अगदी उत्तम पर्याय आहे.

वेगवेगळी रंगीत फुलझाडे घरात जागोजागी असतील तर घरात एक प्रकारचा प्रसन्नपणा येतो. घर जीवंत वाटू लागते. आणि काही फुलझाडे ही इनडोर प्लांटस म्हणजेच सावलीत लावण्याची झाडे असतात.

ऑक्सिजन देणारे इनडोअर प्लांटस कोणते ते वाचा या लेखात.

त्यामुळे आपल्या घराला बाल्कनी आहे की नाही, तेथे ऊन येते की नाही ह्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही.

आपण मस्तपैकी आपल्या आवडीची रंगीत फुलझाडे जागोजागी लावू शकतो. तर मग वीकएंडच्या दोन दिवसात घरात वेगवेगळ्या ठिकाणी हिरवीगार, रंगीत फुले येणारी झाडे लावून आपण आपल्या घराचे सौन्दर्य आणखी वाढवू शकतो. आहे की नाही स्वस्त आणि मस्त पर्याय?

३. वेगवेगळ्या उशा, खुलविति घराची रूपरेषा 

घरात ठिकठिकाणी सुंदर रंगांच्या, मऊसुत उशा ठेवल्या, असलेल्या उशांचे अभ्रे बदलले तरी घराचे रंगरूपच बदलून जाते. वेगवेगळ्या कुशन्स जर सोफ्यावर ठेवल्या किंवा छानशी भारतीय बैठक घालून त्यावर ठेवल्या तर घराचे, घराच्या हॉलचे सौन्दर्य आणखीच खुलून येते.

छान कलाकुसर केलेल्या, मिररवर्क केलेल्या उशा अगदी सहज उपलब्ध असतात.

अशा उशा फारश्या महाग नसल्यामुळे वेळोवेळी बदलणे सहज शक्य होते. तर ही रंगीत युक्ति वापरुन आपल्या घरची सजावट नवी करा. आहे कि नाही छान युक्ति?

४. जुने फर्निचर नवी मांडणी, ठेवा घरात अथवा अंगणी 

बरेचदा त्याच त्याच फर्निचरचा आपल्याला कंटाळा येतो, परंतु त्याच फर्निचरची जागा बदलून ते वेगळ्या ठिकाणी ठेवले तर खोलीची रचना एकदम बदलून जाते, घर नव्यासारखे वाटू लागते.

सोफा, खुर्च्या, भारतीय बैठक ह्यांची जागा बदलून घराला नवेपणा देता येतो. काही खुर्च्या अंगणात किंवा बाल्कनीत ठेवून तेथे सकाळचा किंवा संध्याकाळचा चहा पिण्याचा आनंद घेता येतो.

शिवाय बाल्कनीत किंवा घरात आधी सांगितल्याप्रमाणे फुलझाडे असतील तर सोने पे सुहागा.. तर अशा पद्धतीने अगदी नगण्य खर्चात आणि कमीतकमी वेळात आपल्या घराचे रुपडे पालटता येईल. आहे की नाही छान आयडिया?

५. घरी आणा नवे लाइट, कधी मंद कधी ब्राइट 

आपल्या घरात त्याच त्या जुन्या ट्यूबलाइट आणि बल्ब असतील तर आपले घर आपल्यालाच कंटाळवाणे वाटू शकते.

परंतु अशा वेळी हल्ली बाजारात सहज मिळणारे आणि माफक किंमत असणारे एलईडी दिवे, वेगवेगळी छोटी झुंबरे किंवा लॅम्प शेडस लावल्या तर घरात प्रकाशाचा नवा खेळ करता येऊ शकेल.

काही ठिकाणी प्रखर उजेड, काही ठिकाणी मंद उजेड, वाचण्याच्या जागी वेगळा दिवा अशी रचना करून आपले घर छान सजवता येऊ शकेल.

असे करून आपण कमीतकमी वेळात आणि कमी खर्चात आपल्या घराची सजावट नव्या पद्धतीची करू शकतो.

ह्यासाठी बाजारात असंख्य वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायांचा वापर करून सजावट करणे अगदी सहज शक्य आहे.

तर ह्या आहेत ५ वेगवेगळ्या सोप्या आणि कमी खर्चाच्या टिप्स ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे घर अगदी नव्यासारखे सजवू शकता.

तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि ह्या टिप्स वापरुन सजवलेल्या तुमच्या घराचे फोटो नक्की शेयर करा.

तसेच तुमच्याकडे अशा काही आणखी टिप्स असतील ज्यामुळे आपण आपल्या घराचे रंगरूप बदलू शकतो तर त्या आम्हाला नक्की सांगा.

ह्या लेखातील ही उपयुक्त माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेयर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: © Copyrights 2022. All rights reserved!